Pune News | लाडका भाऊ योजनाही वादात ; जिल्ह्यातील ८ हजार ३०० जण योजनेतून पडले बाहेर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मते मिळविण्यासाठी मोठा गाजावाजा करत अनेक घोषणा केल्या. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या धर्तीवर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. मात्र, आता लाडका भाऊ योजनाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुणे जिल्ह्यातील ८ हजार ३०० भावांनी विद्यावेतन वेळेत मिळत नसल्याने योजनेचा नादच सोडून दिला आहे, तर १ हजार ७०० कार्यरत भावांना तीन महिन्यांपासून विद्यावेतनच मिळाले नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
महायुती शासनाने गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. या योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना, असे नावही दिले. लाडकी बहीण योजनेत महिलांना काहीही न करता दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात येतात. लाडका भाऊ योजनेत सहभागी युवकांना काम करावे लागते. काम केल्यानंतर त्यांना दरमहा १० हजारांपर्यंत विद्या वेतन देण्याची घोषणा शासनाने केली होती. राज्यातील १८ ते ३५ वयोगटांतील युवक योजनेचे लाभार्थी ठरत आहेत.
या योजनेत इयत्ता बारावी पास विद्यार्थांना सहा हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार रुपये, तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना दहा हजार रुपये यांप्रमाणे दरमहा विद्यावेतन देण्याचेही स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची नियमितपणे अंमलबजावणीच होत नसल्याची बाब उघड झाली आहे.कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत ही योजना राबविली जात आहे. यातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. सहा महिन्यांसाठी युवकांना प्रशिक्षणासह विद्यावेतन देण्याची योजना आहे. त्यात मार्च २०२५ पासून आणखी पाच महिने वाढवून योजना अकरा महिन्यांची करण्यात आली आहे.
शासनाकडून निधीच नाही
पुणे जिल्ह्यातील १० हजार युवकांनी सुरुवातीला नोंदणी केली होती. योजना ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात सुरू झाली. डिसेंबरपर्यंत युवकांना दरमहा विद्यावेतन मिळाले. बहुसंख्य युवकांनी खासगी कार्यालयांऐवजी शासकीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याला पसंती दिली होती. जानेवारी २०२५ पासून मात्र शासनाकडून विद्या वेतनासाठी निधीच उपलब्ध करून गेला नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने युवकांनी योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला.
युवक आर्थिक अडचणीत
सद्यस्थितीला योजनेअंतर्गत १०९ कार्यालयांत केवळ १ हजार ७०० एवढेच युवक कार्यरत आहेत. मात्र, त्यांनाही मेपासून विद्यावेतनच मिळालेले नाही. त्यामुळे या युवकांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबाबतचा प्रश्न आहे. भत्ता न मिळालेल्या युवकांकडून संतप्त भावनाही व्यक्त होत आहेत. यावर शासनाला जाग येणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.





