पिंपरी | ‘लाडकी बहीण’ घेणार होती जलसमाधी…

खालापूर, (वार्ताहर) – तालुक्यातील महिला शेतकरी अलका चव्हाण-समेळ यांच्या संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. शेजारील जागा मालकाने त्यांच्या जागेत बंधारा बांधून नैसर्गिक पाणी अडविल्याने अलका चव्हाण यांच्या शेतीचे नुकसान झाले असल्याबाबत त्यांनी खालापूर प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, प्रसंगी उपोषण केले. परंतु शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने अलका चव्हाण-समेळ यांनी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या निर्णयानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने मध्यस्थी करून आठ दिवसात प्रांत कार्यालयात यासंदर्भात न्यायिक भूमिकेसाठी बैठक घेऊन न्याय देण्यात येईल, असे आश्वासन अप्पर तहसीलदार निता कदम यांनी दिले. त्यानंतर अलका चव्हाण यांनी त्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित केले.
अलका चव्हाण-समेळ यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे. तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देत आहात, पण जी बहीण सक्षम आहे, आपली शेती करीत आहे तिला मात्र प्रशासन वाऱ्यावर का सोडत आहे? माझी एकच मागणी आहे,
माझ्या शेतीतले पाणी नैसर्गिकरीत्या गेले पाहिजे. शासन आदेश धुडकावून लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात आत्महत्येचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.





