सरकारी योजनांमुळे कामगार ‘कामचोर’ होत चाललेत का? L&T चे चेअरमन सुब्रह्मण्यन यांच्या नवीन वक्तव्याची जोरदार चर्चा

L&T Chairman SN Subrahmanyan | लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर एसएन सुब्रह्मण्यन पुन्हा एकदा चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे 90 तास काम करावे, असे वक्तव्य केले होते. या वेळी त्यांनी सरकारी योजनांचा उल्लेख करत काही असे काही वक्तव्य केले आहे, की ज्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
“कामगार संधींसाठी इतर ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. कदाचित त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था चांगली आहे, कदाचित हे विविध सरकारी योजनांमुळे असू शकते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. सीआयआय साउथ ग्लोबल लिंकेजेस समिटमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना सुब्रह्मण्यन यांनी बांधकाम कामगारांविषयी मत व्यक्त केले.
बांधकाम उद्योगासाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे, कारण ते आरामदायकतेमुळे गाव सोडून स्थलांतर करण्यास तयार नसतात. मनरेगा, थेट लाभ हस्तांतरण आणि जन धन खात्यांसारख्या योजना कामगारांच्या कामासाठीच्या प्रवासाला प्रभावित करत असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कामगार ‘कामचोर’ झालेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कामगारांच्या भरती आणि सुविधेसाठी कंपनीची स्वतःची एचआर टीम आहे. पण असे असतानाही कामगारांची उपलब्धता होत नाही. बांधकाम मजुरांची भरती करत असताना अनेक अडचणी येत आहेत, असे एसएन सुब्रह्ममण्यन यांनी म्हटले आहे.
सुब्रह्मण्यन यांनी भारताला कामगार स्थलांतराची समस्या भेडसावत असल्याचे म्हटले आहे. L&T ला 4 लाख कामगारांची आवश्यकता असताना, कर्मचारी गळतीमुळे 16 लाख लोकांची भरती करावी लागत असल्याचे म्हटले. याशिवाय, त्यांनी कामगारांच्या वेतनाचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली. कामगारांचा पगार महागाईशी सुसंगत असावा. मध्यपूर्व देश अधिक वेतन देत असल्यामुळे तिकडे कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत, कारण तिथे त्यांना भारताच्या तुलनेत 3 ते 3.5 पट जास्त पगार मिळतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, सुब्रह्मण्यन यापूर्वीही त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे. घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार, अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.





