मुंबई – महाराष्ट्रात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. घरात पाणी घुसले, गोठ्यांत पाणी घुसले, शेतीचे खूप जास्त नुकसान झाले आहे. या शेतक-यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. दरम्यान, यासाठी आधी पाहणी केली जाणार आहे. शेतीची केवायसी केली जाणार त्यानंतरच आर्थिक मदत दिली जाणार आहे. दिवाळीपूर्वी हे पैसे शेतक-यांच्या खात्यात येतील, असे सांगितले होते. मात्र, अजूनही लाखो शेतक-यांची केवायसी बाकी आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे मराठवाड्यातील ११ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी केवायसी झाले तरच शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी तातडीने केवायसी करून घ्यावे आवाहन मराठवाडा विभागीय आयुक्त प्रशासनाने केले आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतक-यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम टाकण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील २० लाख ५९ हजार शेतक-यांसाठी १४८९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ लाख १० हजार शेतक-यांच्या खात्यावर ६७३ कोटी रुपये जमा झाले आहेत. ४ लाख ११ हजार ७१६ शेतक-यांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नसल्यानं २६९ कोटी रुपये त्यांच्या खात्यावर गेलेले नाहीत.