Kuno National Park : पाच चित्ते आता मोकळ्या जंगलामध्ये; ‘कुनो’ अभयारण्याच्या सूत्रांनी दिली माहिती

कुनो (मध्य प्रदेश) – भारतात चित्ते नामशेष होण्याची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबवल्यानंतर भारतात आफ्रिकेतून चित्ते आणले गेले. आता मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यामधील खुल्या पिंजऱ्यात असलेली मादी चित्ता गामिनी आणि तिचे चार बछडे यांना सोमवारी मोकळ्या जंगलात सोडण्यात आले आहे.
यामुळे आता कुनो अभयारण्याच्या मोकळ्या जंगलातील चित्त्यांची संख्या १७ इतकी झाली आहे. नऊ चित्ते अजूनही खुल्या पिंजऱ्यामध्ये आहेत. यापैकी १४ बछड्यांचा जन्म भारतात झाला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक पोस्ट लिहून आशा व्यक्त केली की, चित्त्यांची संख्या वाढल्यामुळे पर्यटकांना आता त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी मिळेल.
गामिनी ही आफ्रिकेहून आणलेली मादी आहे. मोकळे सोडण्यात आलेल्या चार बछड्यांमध्ये दोन नर आणि दोन मादींचा समावेश आहे. हे सर्व बछडे वय १२ महिने वयाचे आहेत.
गामिनीने १० मार्च २०२४ रोजी सहा बछड्यांना जन्म दिला होता. त्यापैकी दोन बछड्यांचा मृत्यू झाला होता. गामिनी आणि तिच्या बछड्यांना खजुरी जंगल भागात सोडल्याची माहिती वन खात्याने दिली आहे.





