Kundmala Bridge: कुंडमळा पुलाला डीआरडीओचाचा ब्रेक! आता शोधावी लागणार नवीन जागा; नेमकं कारण काय?
Kundmala Bridge: मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण; इंद्राणी नदीवरील नव्या पुलासाठी मंजूर ८ कोटींचा निधी पडून.

Kundmala Bridge – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या घटनेत चार जणांचा मृत्यू, तर काही जण जखमी झाले होते. यानंतर शासनाकडून नवीन पूल बांधण्याचे आश्वासन देण्यात आले आणि आठ कोटींचा निधीही मंजूर झाला. मात्र, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सुरक्षेच्या कारणावरील आक्षेपामुळे या पुलाचे काम थांबलेले आहे.
आता या पुलासाठी नवीन जागा शोधण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. मागील वर्षी १४ जून रोजी कुंडमळा येथील इंद्राणी नदीवरील जुना पूल कोसळला होता. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांच्या सोयीसाठी तातडीने नवा पूल बांधला जाईल, असे जाहीर आश्वासन दिले होते.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक बाबी पूर्ण करून नवीन पूल बांधण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधीही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. मात्र, ज्या ठिकाणी जुना पूल होता, त्याच्या अगदी शेजारी असलेल्या डीआरडीओच्या हद्दीच्या १०० मीटर आत हा परिसर येत असल्याने सुरक्षेच्या कारणावरून या बांधकामाला डीआरडीओ प्रशासनाने तीव्र विरोध दर्शवला.
हा तिढा सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी डीआरडीओ चे अधिकारी आणि संबंधित सर्व विभागांची तब्बल दोन वेळा उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, डीआरडीओने सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. यावर पर्याय म्हणून त्याच जागी केवळ पादचारी पूल उभारावा, असा प्रस्ताव पुढे आला होता.
मात्र, ग्रामस्थांच्या दैनंदिन रहदारीसाठी आणि वाहनांच्या जाण्या- येण्यासाठी पूर्ण क्षमतेचा पूल आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी पादचारी पुलाचा हा पर्याय फेटाळून लावला. परिणामी, आता पुलासाठी पूर्णपणे नवीन जागा शोधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे.





