‘मुंबईला गेलो तर…’, कुणाल कामराने व्यक्त केली भीती, अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव

Kunal Kamra | स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केल्याने वादात अडकला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कुणालला नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यातच आता त्याने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कथित वादग्रस्त गाणं तयार केल्याने कुणाल कामरावर शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून निशाणा साधला जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामराने ज्या ठिकाणी कार्यक्रम सादर केला त्या मुंबईतील खारमधील स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. त्यानंतर आता त्याने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना कुणाल कामराने माहिती दिली की, मुंबईत आल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे.
दरम्यान, कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्यांतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. याशिवाय, कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
कुणालविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. आता अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाकडून त्याला अटकपूर्व जामीन मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





