कृष्णा-नीरा-भीमा’ नदीजोड अंतिम टप्प्यात

उजनीचे पाणी जाणार मराठवाड्यात : नीरा- भीमा स्थिरीकरणाचे कामही वेगात
भिगवण – केंद्र शासनाचा महत्वाकांशी असलेला नदीजोड प्रकल्प अंतर्गत कृष्णा- नीरा- भीमा नदीजोड सिंचन प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याला उजनीतून पाणी नेण्याचे काम वेगात सुरू आहे. उजनीतून पाणी मराठवाड्यात जाणाऱ्या करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यातील सुमारे 27 किलोमीटर भूगर्भातील बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे.
उजनी जवळील बोगद्याची पातळी जमिनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्याने उजनीच्या मृत साठ्यातील पाणीही मराठवाड्याला जाईल. गतवर्षी उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्यास मोठा विरोध झाला होता. लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवत मोठे जनआंदोलन उभारले होते.
पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यालात नदीजोड प्रकल्पाअंतर्गत वळविले जात जाणार होते; मात्र पाणीतंटा लवादाने मनाई केल्याने कृष्णा- नीरा- भीमा नदीजोड प्रकल्पातील शेवटच्या पाचव्या टप्याचे काम वेगात असल्याने आता नीरा आणि भीमा नदीजोड प्रकल्पच उभारला जाऊ शकतो. या योजनेत उजनी धरणातील पाणी सुरुवातीला बोगद्यातून ते सीना- कोळेगाव (जि. उस्मानाबाद) धरणात सोडले जाणार आहे.
हा सर्व टप्पा बोगद्याअंतर्गत असून तो उजनी धरण ते सीना- कोळेगाव हा टप्पा करमाळा तालुक्यातील दहिगाव बोगद्याची सुरुवात होऊन पुढे जेऊर, कोंढेज, सरपडोह, सोंदे, शेलगाव (क), अर्जुनसागर, मिरगव्हाण असा टप्पा आहे. यापैकी दहिगाव व जेऊर वगळता इतर आठही ठिकाणी कामे वेगात सुरु आहे. कामाचा असाच वेग सुरु राहिल्यास एक ते दीड वर्षात पाणी मराठवाड्यात जाईल.
पाणी तंटा लवादाने एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात नेण्यास मनाई केली असल्याची बाब पुढे येत असून कृष्णेचे पाणी उजनीत येणार नाही; मात्र उजनीचे पाणी मराठवाड्याला जाणार असल्याने पुढील काही काळातच पाणीसंकट निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
बोगद्यातून सोडणार पाणी
इंदापूर तालुक्यातील नीरा- भीमा नदीजोड प्रकल्पातील 23 किलोमीटर लांब बोगद्यातील 9 किलोमीटर लांब बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तीन वर्षात पूर्ण होऊन उजनी धरणात या बोगद्यातून पाणी सोडले जाणार असून, नीरा नदीतील पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त 1800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार असून 45 दिवसांत 7 टीएमसी पाणी सोडण्याची योजना आहे. यामध्ये तावशी ते भादलवाडी असा बोगदा जमिनीखालून बोगदा जात आहे.
योजनेला विरोध करणारे चिडीचूप..
उजनीचे पाणी मराठवाड्यात नेले जात असताना कृष्णा खोऱ्यातील पाणी उजनीत आधी आले पाहिजे. तोपर्यंत उजनीतून पाणी पुढे जाऊ देणार नाही, अशा वलग्ना काही लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या होत्या. उजनी जवळील बोगद्याची पातळी जमिनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्याने उजनीच्या मृत साठ्यातील पाणीही मराठवाड्याला जाईल असे सांगत बोगद्याला विरोध दर्शविला होता. आधी बोगद्याला विरोध करणारे शांत झाल्याचे दिसून येत आहे.





