“किल बिल’च्या हिंदी रिमेक मध्ये झळकरणार क्रिती सेनन

मुंबई – क्रिती सेननला बरोबर घेऊन हॉलीवूडच्या एका ऍक्शन मुव्हीचा हिंदी रिमेक केला जाणार आहे, असे निखील द्विवेदी आणि अनुराग कश्यपने पूर्वी म्हटले होते. हा हॉलीवूडचा प्रोजेक्ट नक्की कोणता असणार आहे, याची घोषणा आज निखील द्विवेदी आणि अनुराग कश्यपने केली.
हॉलीवूडमधील महान डायरेक्टर क्विंटन टारांटिनोंच्या “किल बिल’ चा रिमेक केला जाणार आहे, असे या दोघांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उमा थनबर्गने साकारलेली भूमिका क्रिती सेनन साकारणार आहे. आता “किल बिल’च्या कथेला हिंदी सिनेमाच्या आधाराने पुन्हा लिहिण्याचे काम सुरू करायचे आहे.
लवकरच हे काम सुरू होईल, असे निखील द्विवेदीने म्हटले आहे. अनुराग कश्यपने या कथेची जबाबदारी घेतली आहे. उमा थनबर्गने “किल बिल’मध्ये ज्या सफाईदारपणे तलवारबाजी केली होती, ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी क्रिती सेननलादेखील आता तलवारबाजी शिकायला लागणार आहे.
या हॉलीवूड ऍक्शन मुव्हीमध्ये उमा थनबर्गचा सामना एका खलनायिकेशी झाला होता. ही खलनायिका देखील तलवारबाजीमध्ये निपुण होती. त्यामुळे क्रिती सेननच्या बरोबर सामना करण्यासाठी बॉलीवूडमधील एक खलनायिका हातात तलवार घेऊन उभी राहिलेली असेल.





