Krishna Janmashtami 2021: असे करा कृष्ण जन्माष्टमीला व्रत; जाणून घ्या शुभ मुहूर्त पूजा विधी आणि महत्त्व

पुणे – कृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असे म्हणतात. आज बालश्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे त्यास नंदगोपाल असेही म्हणतात. गोकुळाष्टमीनिमित्त लहानंग्या मुलांना श्रीकृष्ण आणि मुलींना राधा बनवितात. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धाही आयोजित केली जाते.
लहान मुले कृष्ण बनून आणि लहान मुली राधा बनून या सणाचे आणखी आकर्षण वाढवतात.
लहान मुलाला कृष्ण बनविण्यासाठी कृष्णासारखी हुबेहुब वस्र हल्ली बाजारात मिळतात. कृष्ण बनविण्यासाठी एक मोरपंख टोपी, सुंदर धोतर, बासरी आणि कान्हाने परिधान केलेले इतर दागिने यांच्या मदतीने मुलाला कान्हा बनवू शकता.
लहान मुलीला राधा बनविण्यासाठीसुद्धा हल्ली बाजारात तयार वस्र मिळतात. जे मुलीला परिधान करू शकता. राधासारखे कपडे घालून आणि तिच्यासारखे मेकअप करून मुलीला राधा बनवू शकता.
कृष्ण आणि राधाचा गेटअप अगदीच हुबेहुब झाला नाही तरी चालेल पण श्रीकृष्णासाठी केसात मोरपंख, हातात बासरी, आणि धोतर घातलेले पाहिजेच. मुलींसाठीही बाजारात मुलींसाठीची नऊवारी लुगडे सहज मिळतात.
श्रीकृष्ण जन्माष्टमी
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाला म्हणून जन्माष्टमी साजरी करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. या दिवशी उपवास असतो.
रात्री 12 वाजता कृष्णाची पूजा केल्यानंतर उपवास सोडतात. कंसाच्या कारागृहात मथुरा येथे देवकीचे आठवे अपत्य म्हणून श्रीकृष्णाचा जन्म होतो. श्रीकृष्ण जन्माष्टमी कृष्ण जयंती म्हणूनही साजरी केली जाते. दुसऱ्याच दिवशी गोपाळकाला असतो.
हा उत्सव दहिकाला उत्सव म्हणून साजरा करतात. उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने वृंदावन, गोकूळ, मथुरा, द्वारका, जन्नाथपुरी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
जन्माष्टमी तिथी
आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आहे. अष्टमी तिथी 29 ऑगस्ट रोजी रात्री 11.25 पासून सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी दुपारी 01.59 वाजता संपेल.
रोहिणी नक्षत्र 30 ऑगस्ट रोजी सकाळी 06.39 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 09.44 वाजता संपेल. पूजेची वेळ 30 ऑगस्टच्या रात्री 11.59 ते 12.44 पर्यंत असेल. या मुहूर्ताचा एकूण कालावधी 45 मिनिटे आहे.
जन्माष्टमी व्रत
जन्माष्टमी व्रतामध्ये अन्न ग्रहण केले जात नाही. हा उपवास एका ठराविक कालावधीत सोडला जातो. सामान्यत: अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या समाप्तीनंतर जन्माष्टमीचा उपवास सोडला जातो.
यापैकी एकही मुहूर्त सूर्योदयानंतर सूर्यास्तापूर्वी संपत नसेल तर सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. जर या दोन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आधी संपला, तर त्या वेळानंतर जन्माष्टमीचा उपवास सोडता येतो.





