Ravi Pandit Passes Away: KPIT टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक रवी पंडित यांचे पुण्यात निधन; उद्योग विश्वावर शोककळा
Ravi Pandit Passes Away: अभ्यासू नेतृत्व, विनम्र स्वभाव आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले.

Ravi Pandit Passes Away: देशातील नामवंत मोबिलिटी तंत्रज्ञान कंपनी ‘केपीआयटी (KPIT) टेक्नॉलॉजीज’चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे तंत्रज्ञान, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील एका प्रगल्भ मार्गदर्शकाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
संस्था निर्माण आणि सामाजिक योगदान –
रवी पंडित हे एक सुवर्णपदक विजेते चार्टर्ड अकाउंटंट आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित एमआयटी (MIT) स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ व्यवसायच उभारला नाही, तर ‘किर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंटंट्स’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही प्रदीर्घ काळ सेवा दिली. तंत्रज्ञान-आधारित मोबिलिटी आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी केलेले कार्य भारतासह जागतिक स्तरावर महत्त्वाचे मानले जाते.
पुण्यातील औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान –
व्यावसायिक जबाबदारी पलीकडे जाऊन पंडित यांनी पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’चे (MCCIA) माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी पुण्यातील औद्योगिक आणि सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’च्या अधिकारप्राप्त गटात खाजगी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव सदस्य होते.
शाश्वत ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा ध्यास घेतलेल्या पंडित यांनी अलीकडेच ‘हृदय’ (HRIDAY) हा उपक्रम सुरू केला होता, ज्याचा उद्देश स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाद्वारे कृषी आणि ग्रामीण विकास साधणे हा होता. त्यांनी लिहिलेले ‘लीपफ्रॉगिंग टू पोल-वॉल्टिंग’ हे पुस्तक नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी ओळखले जाते. त्यांच्या जाण्याने उद्योग क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच, फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत देखील त्यांनी स्थान पटकावले होते.
‘केपीआयटी’चे सहसंस्थापक, अध्यक्ष, ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक श्री. रवी पंडित यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून अनेक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून… pic.twitter.com/BKUK7wCItc
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 8, 2026
उद्योगविश्वाने संवेदनशील नेतृत्व गमावले : सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘केपीआयटी’चे सहसंस्थापक, अध्यक्ष, ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक रवी पंडित यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून अनेक संस्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.
अभ्यासू नेतृत्व, विनम्र स्वभाव आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले. त्यांच्या निधनाने पुण्यासह संपूर्ण उद्योगविश्वाने एक दूरदर्शी आणि संवेदनशील नेतृत्व गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. पंडित कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.


