नवी दिल्ली – वाहन क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवठा करणार्या पुण्यातील केपीआयटी टेक्नॉलॉजीज या कंपनीने सोमवारी दुसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदातील माहितीनुसार या तिमाहीत कंपनीचा नफा 17 टक्क्यांनी कमी होऊन 169 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या कंपनीला 203 कोटी रुपयांचा नफा झाला होता, अशी माहिती कंपनीने शेअर बाजारांना सोमवारी कळविली. या तिमाहीत कंपनीचा महसूल मात्र वार्षिक पातळीवर 7.9 टक्क्यांनी वाढून 1,587 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 1,471 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. पहिल्या तिमाहीतील नफ्यापेक्षा दुसर्या तिमाहीतील नफा 1.6% कमी झाला आहे. तर महसूल 3.18 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे वार्षिक आणि तिमाही पातळीवरही कंपनीचा नफा कमी झाला मात्र महसूल वाढला असल्याचे दिसून येते. कंपनीने या तिमाहीत इतर काही कंपन्यांचे अधिग्रहण केले किंवा गुंतवणूक केली आहे. दीर्घ पल्ल्याच्या दृष्टिकोनातून हे निर्णय घेतले असल्याची माहिती कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पाटील यांनी सांगितले. ताळेबंदातील माहितीनुसार सध्या कंपनीकडे 232 दशलक्ष डॉलर मूल्याच्या ऑर्डर आहेत. या तिमाहीत कंपनीने 334 नव्या कर्मचार्यांची नियुक्ती केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचार्यांची संख्या 12,879 इतकी झाली आहे.