Koynanagar News | कोयना परिसरात पावसाचा विक्रमी मारा ; ओझर्डे धबधब्याचा नजारा अनुभवायला पर्यटकांची झुंबड

प्रभात वृत्तसेवा
कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. सततचा पाऊस, दाट धुके, डोंगररांगांवर पसरलेली हिरवाई आणि थंड हवा यामुळे या परिसरात निसर्ग बहरला आहे. यावर्षी नवजा महाबळेश्वरपेक्षा जास्त, म्हणजे तब्बल 5,281 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नवजा येथे थंड हवा आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ओझर्डे धबधबा आणि धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे.
सोमवारी सायंकाळी 5 पर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी 658.749 मीटर झाली होती. पाणीसाठा 102.33 टीएमसी (97.23 टक्के) असून, धरणात 10,876 क्युसेक (0.93 टीएमसी) आवक झाली. सध्या धरणातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी नवजा येथे 16 मिमी (एकूण 5281), महाबळेश्वर येथे 10 मिमी (एकूण 5076) आणि कोयनानगर येथे 7 मिमी (एकूण 4285) पावसाची नोंद झाली.
धरण भरल्याने सिंचन, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार आहे.सततच्या पावसामुळे नवजा परिसर गारठला असून, धुक्यामुळे पर्यटकांना हिल स्टेशनचा अनुभव येत आहे.
पावसाळ्यात शेकडो फूट उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा, पाण्याचा कानात घुमणारा आवाज आणि धुक्याने भरलेले सभोवतालचे डोंगर, हे दृश्य पर्यटकांना मोहून टाकत असल्याने, स्थानिकांसह राज्याच्या कानाकोपर्यातील पर्यटक आकर्षित होत आहेत. ओझर्डे धबधबा आणि धरण परिसरातील निसर्गाची उधळण पाहता, भविष्यात नवजा हे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर नवे केंद्र म्हणून झळकेल यात शंका नाही.





