Koynanagar : मने उजळवणारी दिवाळी! शंभूराज देसाईंनी जपली फराळाची परंपरा, ऐक्याचा संदेश देत केले दीपप्रज्वलन

प्रभात वृत्तसेवा
कोयनानगर – दिवाळीचा सण फक्त दिव्यांचा नसून, नात्यांची उजळणी करणारा असतो. त्यानुसार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत स्मारकात दिवाळी फराळ कार्यक्रम शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी मोठ्या उत्साहात झाला.या कार्यक्रमात उपस्थितांचे हसरे चेहरे, गप्पांचा गोडवा आणि जुन्या आठवणींनी भरलेले क्षण यामुळे परिसर उजळून निघाला.
या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, राजेंद्रसिंह यादव, तहसीलदार अतुल मेह्त्रे, अनंत गुरव, अनेक राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘अमृत मराठी’ या गटाने सादर केलेल्या बहारदार मराठी गाण्यांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मी पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी झाल्यापासून दिवाळी फराळाची परंपरा सुरू करण्यात आली आहे. दिवाळी हा फक्त दिव्यांची सणनसून, मने उजळवणार्या माणसांचा सण आहे. एकत्र येणे, स्नेहाने भेटणे आणि प्रेमाची देवाणघेवाण करणे, हे दिवाळीचे सार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन, दीपप्रज्वलन करत ऐक्याचा संदेश दिला.





