Koyananagar: कोयनेच्या माशांची पर्यटकांना भुरळ
Koyananagar कोयना परिसरात उपलब्ध असलेले मासे स्थानिकांच्या खास पद्धतीने तयार केले जातात.

Koyananagar: कोयना धरणाचा जलाशय, सभोवतालची हिरवाई आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांची भुरळ पडली असून यामध्ये कोयनेचे मासे हा खवय्यांचा ‘वीक पॉईंट’ ठरला आहे. शेंगळ, मरळ, काळोसा आणि परग या माशांना मागणी वाढली आहे.
कोयना परिसरात उपलब्ध असलेले मासे स्थानिकांच्या खास पद्धतीने तयार केले जातात. कांदा, लसूण, खोबरे, लाल तिखट आणि विविध मसाल्यांचा वापर करून माशांची आमटी केली जाते. काही ठिकाणी मसाला लावून मासे तव्यावर तळले जातात. गरम भाकरी किंवा भातासोबत हा बेत केला जातो. गरमागरम भाकरीचा घास, त्यासोबत माशाचा तुकडा आणि झणझणीत आमटी अशी साधी पण चवदार मेजवानी खवय्यांना पसंत पडत आहे. या परिसरात उपलब्ध असलेल्या शेंगळ आणि मरळ जातीच्या माशांना विशेष मागणी असताना काळोसा आणि परग या जातीच्या माशांनाही पसंती मिळत आहे. स्थानिक पद्धतीने तयार होणार्या पदार्थांमुळे या माशांना परिसरातील खाद्यसंस्कृतीत वेगळे स्थान आहे.
कोयना, नवजा, ओझर्डे आणि परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देणारे काही पर्यटक जेवणाचीही चौकशी करतात. पर्यटनाच्या दिवसांत स्थानिक खानावळी तसेच मासे विक्री करणार्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो. कोयनेच्या पर्यटनाला स्थानिक खाद्यसंस्कृतीची जोड मिळाल्यास स्थानिक व्यवसायालाही चालना मिळू शकते. त्यासाठी स्वच्छता, पदार्थांचा दर्जा आणि योग्य दर याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
कोयनेची ओळख धरण, जलाशय आणि सह्याद्रीच्या निसर्गामुळे आहेच याशिवाय या परिसरातील स्थानिक खाद्यपदार्थाची चवही पर्यटकांच्या वेगळया अनुभवाचा भाग बनत आहे.


