Koyna Dam : कोयना जलसागराने गाठला शंभर टीएमसीचा टप्पा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जलपूजन
अवघ्या 7 टीएमसी पाणीसाठ्यावर आलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 100 टीएमसीचा टप्पा (Koyna Dam) गाठल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Koyna Dam : अवघ्या 7 टीएमसी पाणीसाठ्यावर आलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने 100 टीएमसीचा टप्पा (Koyna Dam) गाठल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या जलसाठ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज विधिवत जलपूजन करुन ओटी भरण करण्यात आले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “एके काळी कोयना धरणात केवळ 7 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिले होते. ओहोटी लागल्यासारखी स्थिती झाली. मात्र, नंतर मात्र निसर्गाने चांगली साथ दिल्यामुळे धरणाच्या (Koyna Dam) पाणीसाठ्याने पुन्हा भरती पाहिली.
धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाला आहे, ही समाधानकारक बाब असून यामुळे महाराष्ट्र चिंतामुक्त झाला आहे.” छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे.
महाराष्ट्राच्या, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या भरभराटीत आणि संपन्नतेत या धरणाचा मोठा वाटा आहे. सध्या धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने सिंचनासह विद्युतनिर्मितीचा प्रश्न मार्गी लागला आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
या साठ्यामुळे शेतकरी, नागरिक तसेच औद्योगिक वीजवापरासाठीही मोठा दिलासा मिळणार असून, आगामी काळात उपलब्ध जलसंपत्तीचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्यावर भर देण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.
जलपूजन सोहळ्यास (Koyna Dam) निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर, उपअभियंता किरण कानुगडे, अभय पळसकर, सहायक पालीस निरीक्षक एस. के. ओलेकर, सभापती सविता पवार, सदस्य मंगल माने, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सावळाराम लाड यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.






