कोयनानगर – कोयना धरण परिसरात गत काही दिवस उघडीपीनंतर रविवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता नोंदवलेली जलपातळी 650.469 मीटर इतकी असून, धरणात 73.70 टीएमसी पाणीसाठा झाला असून वक्र दरवाज्याला पाणी टेकले आहे. गत तीन दिवस पाणलोट क्षेत्रात पावसाचा ग्रीन सिग्नल होता. पावसाची उघडीप असल्याने धरणात पाण्याची आवक कमी होती. मात्र रविपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने साठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणामध्ये सद्यस्थितीमध्ये 73.70 टीएमसी म्हणजेच 70 टक्के पाणीसाठा असून पाणीपातळी 650.469 मीटर झाली आहे. धरणातील पाण्याची आवक 7 हजार 244 क्यूसेक्स आहे. तर धरणातून 2 हजार 100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गत चोवीस तासात कोयना येथे 6 मिमी, नवजा 21 तर महाबळेश्वर विभागात 16 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुरस्थिती लक्षात घेता धरण व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, धरणाचे संचालन परिचालन सूचीप्रमाणेच सुरू आहे. धरणातील वाढत्या जलपातळीवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या जलपातळी नियंत्रणात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास आणि आवक वाढल्यास, पुढील 48 तासांत आवश्यक निर्णय घेतले जातील. – महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, कोयना धरण