पुणे जिल्हा | चतुर्थ श्रेणी दर्जासाठी कोतवालांनी दिली संपाची हाक

रांजणी,(वार्ताहर) – कोतवाल संवर्गाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे महसूल विभागाचे काम ठप्प पडेल.
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा ही कोतवाल संघटनेची जुनी मागणी आहे. प्रत्येक पदाचे वेगळे महत्त्व असते. परंतु, मानधनावर काम करणाऱ्या पदांमध्ये कोतवाल व इतर पदे यांच्या कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये खूप मोठी तफावत आहे.
कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करून देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो. तसेच महसूल प्रशासनात स्थानिक पातळीवरील दैनंदिन कामे तसेच क्षेत्रीय कामे इमानेइतबारे पार पाडतो.
कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास २४ सप्टेंबरला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन, २५ सप्टेंबरपासून राज्यभर काम बंद आंदोलन तसेच २६ सप्टेंबर रोजी आझाद मैदान, मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही कोतवाल संघटनेने दिला आहे.
” कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देणे ही मुख्य मागणी आहे. महसूल प्रशासनातील कोतवाल हे सर्वांत कनिष्ठ दर्जाचे पद असले तरी या पदाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पदाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यास काहीच हरकत नाही. – भाऊसाहेब जुंदरे, अध्यक्ष, आंबेगाव तालुका कोतवाल संघटना.





