पुणे जिल्हा | दमदार पावसामुळे पुणे जिल्ह्यात रब्बीवर बळीराजाचा भर

रांजणी (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यातील सर्व जलाशयांमध्ये यंदा पुरेसा असलेला पाणीसाठा त्याचबरोबर परतीच्या मान्सूनमुळे पोषक पडलेली मृदा आद्रता यामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बी हंगाम अधिक जोमात राहील असे चित्र आहे.
शेतकऱ्यांनी देखील रब्बी हंगामाची नियोजन सुरू केले असून यंदा जिल्ह्यात रब्बीचा पेरा वाढण्याची संकेत दिसून येत आहे .
कृषी विभागानुसार जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र सुमारे २ लाख ५० हजार हेक्टर आहे. त्या अनुषंगाने यंदा रब्बी हंगामात वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
रब्बी हंगामात तेलबिया पिकांना फारसा भाव नसतो. मात्र, गहू हरभरा या पिकांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे जिल्हा रब्बी हंगामासाठी ओळखला जातो. जिल्ह्यात जलाशयाचा मोठा पाणीसाठा आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जलाशय यंदा पूर्ण क्षमतेने पाण्याने भरले आहे. त्यामुळे यंदा ज्वारी,गहू,हरभरा या पिकांची पेरणी वाढेलेली आहे. शिवाय कांदा आणि ऊसाचे क्षेत्र सुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्याला सिंचन क्षेत्रासाठी वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, वडज आणि येडगाव धरणात देखील पाणीसाठा यावर्षी असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
पुणे जिल्ह्यात दमदार पावसाने प्रमुख धरणांसह लहान-मोठे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. रब्बी हंगामात सर्वाधिक कांदा पीक तसेच दुष्काळी तालुक्यात देखील उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसामुळे बळीराजा ज्वारी, गहू पिकांवर भर देण्याची शक्यता आहे. रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र असून त्यात प्रामुख्याने ५० हजार हेक्टरवर वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामध्ये प्रामुख्याने ज्वारीची सुमारे सव्वा लाख हजार हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यासह गहू ,हरभरा,जवस,सूर्यफूल या पिकांच्या लागवडी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.
यंदा विहीर, बोअरला चांगले पाणी आहे. रब्बीत हरभरा आणि गहू पिकाबरोबरच कांदा लागवडीचे नियोजन आहे. परंतु यंदा कमी बाजार भाव आणि घटलेल्या उताऱ्यामुळे सोयाबीन विकून पैशाची तजवीज करणे शक्य दिसत नाही.
उधार उसनवारी करून पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान आणि पीक विमा जमा केला तर पेरणीसाठी थोडा आधार मिळेल, असे शेतकरी महेश जाधव यांनी सांगितले.
रब्बीसाठी राज्यभर पोषक परिस्थिती
यंदा रब्बी हंगामासाठी अतिशय पोषक स्थिती राज्यभर आहे. जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे संरक्षित सिंचनाच्या क्षेत्रात असलेल्या रब्बी पिकांना सिंचनाची अडचण येणार नाही.
रब्बी हंगामाला अत्यावश्यक असलेली खते आणि बियाणे उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाची तयारी सुरू झाली असल्याचे विस्तार व प्रशिक्षण विभागाचे जिल्ह्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सांगितले.





