कोथरूड विधानसभा मतदारसंघ: नऊ जणांची माघार, १२ जण रिंगणात

पुणे – कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतून नऊ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात बारा उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचे चंद्रकांत पाटील आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत मोकाटे, मनसेचे अॅड. किशोर शिंदे आणि अपक्ष विजय डाकले यांच्यात लढत पहायला मिळणार आहे.
या मतदारसंघात एकूण २३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. छाननीत दोन अर्ज बाद झाल्यामुळे २१ उमेदवारी अर्ज राहिले होते. आता अर्ज माघारीनंतर अधिकृत पक्षांचे चार, नोंदणीकृत पक्षांचे दोन तर सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. कमीत कमी उमेदवार असावेत, यासाठी अधिकृत पक्षाच्या नेत्यांकडून अर्ज माघारीसाठी धावपळ सुरू होती.
त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून बाबूराव चांदेरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे माघारीसाठी अनेकांनी सकाळपासून “फिल्डिंग’ लागली. नियोजित वेळेत पंधरा मिनिटे राहिली असताना चांदेरे यांनी अर्ज माघारी घेतला. तसेच ब्राह्मण समाजाकडून अमेय जोशी यांच्यासह मराठा समाजातील इच्छुकांतून अर्ज भरलेल्या उमेदवारांचे मत परिवर्तन करण्यात यश आल्यामुळे एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र, महायुतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विजय डाकले यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात महायुतीला यश आले नाही.
रिंगणात असलेले उमेदवार –
चंद्रकांत पाटील (भाजप), चंद्रकांत मोकाटे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), अॅड. किशोर शिंदे (मनसे), महेश म्हस्के (बहुजन समाज पार्टी), प्रकाश दहिभाते (भारतीय युवा जन एकता पार्टी), योगेश राजापूरकर (वंचित), विजय डाकले (अपक्ष), किरण रायकर (अपक्ष), सुहास गजरमल (अपक्ष), विराज डाकवे (अपक्ष), सचिन धनकुडे (अपक्ष), सागर पोरे (अपक्ष)
निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार –
अॅड. योगेश मोकाटे (अपक्ष), बाबूराच चांदेरे (राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्ष), अनिल चव्हाण (रिपाइं-आठवले), सोनाली ससाणे (राष्ट्रीय समाज पक्ष), अमेय जोशी (अपक्ष), प्रकाश बालवडकर (अपक्ष), भूषण शिर्के (अपक्ष), मुरलीधर ज्वारी (अपक्ष), विजय बराटे (अपक्ष),
मला चिन्ह नको…
अर्ज माघारीनंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. त्यावेळी सचिन धनकुडे यांनी “मला चिन्ह नको. विनाचिन्ह निवडणूक लढवायची आहे,’ अशी मागणी केली. त्याबाबतचे निवेदनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. मात्र, नियमानुसार चिन्ह घेणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे धनकुडे यांनी दिलेल्या पर्यायातून चप्पल हे चिन्ह दिले.





