Koregaon News – स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणाऱ्या कोरेगाव नगरपंचायतीच्या अनागोंदी आणि निष्क्रिय कारभाराचा फटका आता थेट नागरिकांना बसू लागला असून ऐन उन्हाळ्यात शहर अंधारात बुडाले आहे आणि पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. याबाबत राष्ट्रवादी-शिवसेना आक्रमक झाली असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून स्ट्रीटलाईट सुरू करण्यात यावी, अन्यथा गुरुवारी सकाळी नगरपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रीतम बर्गे, सामाजिक कार्यकर्ते गणेश धनावडे, दिनेश सणस तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांनी मंगळवारी रात्री शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे पत्रकार परिषद घेत नगरपंचायतीच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. जलसंपदा विभाग आणि महावितरण कंपनीच्या वाढत्या थकबाकीमुळे दोन्ही विभागांनी कठोर कारवाई करत नगरपंचायतीला चांगलाच दणका दिला आहे. कृष्णा सिंचन विभागाने कठापूर येथील कृष्णा नदीवरील पंप हाऊस थकबाकीपोटी सील केले असून महावितरण कंपनीने तब्बल ५४ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे शहरातील स्ट्रीटलाईटचे कनेक्शन पूर्णपणे खंडित केले आहे. परिणामी कोरेगाव शहर अंधाराच्या गर्तेत सापडले असून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. नगरपंचायत प्रशासन मार्च अखेरीचे कारण पुढे करून नागरिकांकडून कडक स्वरूपात मिळकत कर वसूल करत असताना शासकीय देणी भरण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. अनेक नागरिकांनी कर्ज काढून कर भरला असतानाही प्रशासनाने जबाबदारी टाळल्याचे सांगण्यात आले. कृष्णा सिंचन विभागाचे सुमारे एक कोटी रुपये आणि महावितरण कंपनीचे ५४ लाख रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे. यावेळी आशुतोष विरकर, करण फडतरे, लोयेश फडतरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.