Koregaon News : मोठी बातमी! कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकाच्या हातात
Koregaon News : सरपंच आणि सदस्यांचा कार्यकाळ संपला; आता ग्रामपंचायत अधिकारी आणि विस्तार अधिकारी सांभाळणार गावाची धुरा.

Koregaon News – सातारा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना विलंब होत असल्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा कारभार तात्पुरता प्रशासकांच्या हाती जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
सातारा जिल्ह्यात मागील वर्षात मुदत संपलेल्या १४५ तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ८७१ अशा एकूण १,०१६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेस अद्याप वेळ लागणार आहे. न्यायालयाचा अवमान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने संबंधित ग्रामपंचायतींवर नवीन सरपंच व सदस्य निवडून येईपर्यंत प्रशासक नेमण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत या प्रशासकांची नियुक्ती केली जाणार असून, यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांचा समावेश असेल. नवीन लोकनियुक्त कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत गावातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज, विकासकामे तसेच शासकीय योजना राबविण्याची जबाबदारी या प्रशासकांकडे असणार आहे.





