HPV Vaccination Satara : मुलींचे ‘कॅन्सर’पासून संरक्षण! एचपीव्ही लसीकरणाचा शुभारंभ; अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
HPV Vaccination Satara : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोठा दिलासा; ९० दिवसांच्या विशेष मोहिमेत १५ वर्षांपर्यंतच्या मुलींनाही मिळणार लाभ.

HPV Vaccination Satara – महिलांमध्ये झपाटयाने वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर आळा घालन्यासाठी केंद्र शासनाने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर करीता मोफत लसीकरण करण्यात येत असून अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सौ. प्रिया शिंदे यांनी केले. देशभरातील 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहीम लवकरच राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत गार्डासिल ही लस मोफत देण्यात येणार आहे. या लसीचा फक्त एक डोसच आहे. या मोहिमेच्या अनुषगांने एचपीव्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पुर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पुर्ण केलेली नाहीत) अशा मुलींना देण्यात येईल. मोहिम सुरु झाल्या नंतर पुढील 90 दिवसांच्या कालवधीत 15 वर्षे पुर्ण होणा-या मुली देखील या तीन महिन्यांच्या एचपीव्ही लसिकरण मोहिमेस पात्र राहतील.
एकूण लोसंख्येच्या 1 टक्के लाभार्थी हे मोहिमेकरीता अपेक्षीत लाभार्थी असतील. या मोहिमेत विशेषत: आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील कुटुंबाना दिलासा मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हयात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने कस्तुरबा युपीएचसी सातारा या ठिकाणी सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष राजू भोसले,
समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनिल चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र जाधव, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बजरंग खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक थोरात, डॉ. रसिका गोखले उपस्थित होते.
लसीकरणाचे काही दुष्परिणाम नाहीत
एचपीव्ही लसीकरणाचे काही दुष्परिणाम नाहीत. याबाबतचा समाजामधील गैरसमज दूर करण्यासाठी डॉ. सुनिल चव्हाण यांची कन्या समिक्षा सुनील चव्हाण व डॉ. विवेक भोसले यांची कन्या मुगधा विवेक भोसले यांना एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. यामुळे समाजामध्ये एक प्रकारे चांगला संदेश जाईल व लोकांच्या या लसीविषयी गैरसमज दूर होऊन ते आपल्या मुलींना एचपीव्ही लसीकरण करुन घेतील, असा विश्वास सौ. प्रिया शिंदे यांनी व्यक्त केला.






