Koregaon crime : कोरेगाव तालुक्यात खळबळ! परतवडीत पाणीवाटपाच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी
Koregaon crime : कोरेगाव तालुक्यातील परतवडी येथे शेतातील पाणीवाटपावरून दोन नातेवाईक कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली असून, दोन्ही बाजूने तक्रारी दाखल झाल्याने पोलीस तपास करत आहेत.

Koregaon crime – परतवडी, ता. कोरेगाव येथे शेतातील पाणीवाटपाच्या वादातून दोन नातेवाईक कुटुंबांमध्ये हाणामारी घटना घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्याने कोरेगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक माहिती अशी, परतवडी येथील सुनिता चंद्रकांत दिसले (वय 54) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
बुधवार, दि. 3 जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर कॅनॉलचे पाणी नदीच्या पाइपलाइनमध्ये सोडण्याच्या कारणावरून त्यांचा पुतण्या अमोल अशोक दिसले याच्याशी वाद झाला. यावेळी चेंबर का बंद करत आहेस, मला उसाला पाणी द्यायचे आहे, असा जाब विचारल्यानंतर अमोल दिसले संतप्त झाला.
त्याने शिवीगाळ करत हातातील फावडे व पाना याने सुनिता दिसले यांच्या नाकावर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार जोतीराम शिंदे करत आहेत. दरम्यान, त्याच घटनेबाबत अमोल अशोक दिसले (वय 38) यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे.
त्यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या मोठ्या चुलती सावित्रा दिसले यांच्याशी बोलत असताना सुनिता चंद्रकांत दिसले यांनी हातातील खुरप्याने त्यांच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले. त्यानंतर निलेश चंद्रकांत दिसले याने लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर दोन ते तीन वेळा मारहाण केली.
तसेच विनोद शिंदे (रा. पिपोडे खुर्द) यांनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक देवकी घाडगे तपास करत आहेत. दोन्ही गुन्ह्यांमधील जखमींना उपचारासाठी कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.





