Pune Crime: उपचारासाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने खासगी रुग्णालयाकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने पुण्यातील रुग्णालयात आयईडी (स्फोटकसदृश यंत्र) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजी राठोड या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरातून अटक केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हा पुण्यातील मांजरी परिसरात कपड्यांचे दुकान चालवतो. १० मे रोजी तो उपचारासाठी हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयात गेला होता. मात्र, उपचाराचा खर्च जास्त असल्याने त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यानंतर रुग्णालयात बॉम्ब ठेऊन खंडणी उकळण्याचा कट त्याने रचला. हेही वाचा – महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; 24 IPS अधिकाऱ्यांची बदली, पहा संपूर्ण यादी बुधवारी सायंकाळी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात आयईडी आढळून आल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ते निकामी केले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटली. त्याच्या दुकानाच्या झडतीत आयईडीमध्ये वापरलेल्या टाइमरचे रिकामे कव्हरही जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपी मुंबई एलटीटी-शालीमार एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एटीएस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) संयुक्त कारवाईत नागपुरात पकडण्यात आला. या कटात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.