Konkan Rain: कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं; रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट !

Konkan Rain : राज्यासह कोकणात पावसाचा जोर कायम राहिला आहे. कोकणात आज काही भागात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सांगली, सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर पाणी भरले. त्यामुळे या भागांतील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
रायगड जिल्ह्यात शनिवारी रात्रभरापासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कुंडलिका, पाताळगंगा आणि अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड आणि पोलादपूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. सावित्री नदी दुथडी भरुन वाहत असून पावसाचा जोर पुढील काही तास कायम राहिला तर नदीला पूर येण्याची आहे. त्यामुळे एनडीआरएफची टीमदेखील सावित्री नदीच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहे.
मुसळधार पावसाचा फटका भिवंडी शहरासह ग्रामीण भागालाही बसला आहे. खाडीपार परिसरात 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचले असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले. कल्याण परिसरातही पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच रविवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबई गोवा महामार्ग देखील बंद झाला आहे.





