Konkan Railway : दरड कोसळल्याने कोकण रेल्ले ठप्प ! अडकलेल्या प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे थांबलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये 15 तासांपेक्षा जास्त काळ अडकलेल्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन बसेसची व्यवस्था रेल्वेकडून करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी नेऊन सोडण्यात आले.
रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विन्हेरे ते दिवाण खवटी स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यानंतर रेल्वे गाड्या रोखून धरण्यात आल्या त्यात अनेक तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.
या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने रविवारी या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील रोहा आणि केरळमधील ठोकूर दरम्यान पसरलेला आहे. मुसळधार पाऊस आणि रुळांवर चिखल आल्याने दरडी हटवण्याच्या प्रक्रियेला जास्त वेळ लागत आहे,असे कोकण रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.
रत्नागिरी येथे काही गाड्या थांबवण्यात आल्या आणि अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी सायंकाळपासून कोकण रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या किंवा अन्यत्र वळवल्या.





