कोल्हापूर, सांगलीला पुराची धास्ती कायम; पावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळी मर्यादित

कोल्हापूर / सांगली – पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी पावसाची उघडीप असली तरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कोल्हापूर आणि सांगलीला पुराची धास्ती कायम आहे.
यामुळे पंचगंगा, वारणा, कृष्णाकाठ अद्याप धास्तावलेला आहे. सांगली, मिरज शहरात कृष्णा नदीने शनिवारी इशारा पातळी गाठली असून मदत व बचाव कार्यासाठी सैन्य दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
शुक्रवारपासून पावसाचा जोर मंदावला असला तरी अधूनमधून पावसाची सर येतच आहे. ओढे, नाल्यांना पाझर सुरू झाल्याने हे पाणी नदीपात्रात मिसळून पाणी वाढत असताना धरणातील पाणी पातळी मर्यादित ठेवण्यासाठी चांदोलीतून १६ हजार ३८५ आणि कोयनेतून ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
यामुळे पावसाचा जोर नसला तरी नदीतील पाणी पातळी वाढत आहे. शनिवारी सांगलीमध्ये तर शुक्रवारी मिरजेत कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली. सांगलीत आयर्विन पूलाजवळ असलेली इशारा पातळी ओलांडून कृष्णा नदीची पाणी पातळी ४० फूट ४ इंच झाली असून मिरजेतील कृष्णा घाट येथे ५२ फूट ५ इंच झाली आहे.
सांगलीत ४५ फूट तर मिरजेत ५७ फूट धोका पातळी आहे. दुसरीकडे धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.





