Nagar: हिवाळी क्रीडा स्पर्धेत सिद्धार्थनगर शाळेने गाजवले मैदान

श्रीगोंदा: जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धांत जिल्हा परिषदेच्या सिद्धार्थनगर शाळेने मोठे यश मिळवले. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय, श्रीगोंदा येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
जिल्हा परिषदेच्या सिद्धार्थनगर शाळेने मुली मोठा गट कबड्डी व खो-खो यात प्रथम क्रमांक पटकावला. मुलांनी मोठा गट कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. थाळी फेकमध्ये ऋषी सचिन वायदंडे याने 16 मीटर थाळी फेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सम्राट पप्पू घोडके या विद्यार्थ्याने मोठ्या गटात लांब उडी व उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. राखी अमोल घोडके या विद्यार्थिनीने उंच उडीमध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. लहान गटामध्ये मुले व मुली या दोन्ही संघांनी कबड्डी व खो-खो मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
श्रीगोंदा बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या गटातील मुलींनी कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावत तालुकास्तर गाठला. थाळी फेकमध्ये पुन्हा एकदा ऋषी सचिन वायदंडे हा विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवत तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरला. मोठा गट कबड्डीमध्ये मुलांनी द्वितीय क्रमांक मिळविला. खो-खो मध्ये मोठ्या गटातील मुलींनाही द्वितीय क्रमांक मिळाला. यापूर्वीच झालेल्या तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये समूहगीत गायनात मोठ्या गटात मुलींनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संदीप मोटे, सहशिक्षक संतोष खंडागळे, संतोष सोनवणे, शारदा शेळके, वर्षा घालमे, ज्योत्स्ना खंडागळे, मंगल जाचक आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.





