कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. आज रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागली.
काय घडले नेमके?
कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली. हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली. केशराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळ जवळच असल्याने हीच आग पुढे नाट्यगृहात शिरली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजत आहे. या आगीमध्ये नाट्यगृहांच्या सर्व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत.
केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जात आहे. आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरु नव्हता. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे.





