#SAvIND 1st ODI : कोहलीचा अहंकार आजही टीकेचे लक्ष्य

पार्ल – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली कर्णधार नसून सर्वसामान्य खेळाडू म्हणून खेळत आहे. एकदिवसीय नेतृत्वावरून हटवले गेल्यावरही कोहलीचा अहंकार मात्र कायम राहिला आहे. आता त्याच्या याच वर्तनावरून पुन्हा एकदा प्रचंड टीका सुरू झाली आहे.
कोहली आता कर्णधारही नाही. मात्र, त्याचा अहंकार आणि मैदानातील वागणे बदललेले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहली दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावरच भडकला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 36 व्या षटकात भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले, पण हा फटका जास्त लांब जाऊ शकला नाही.
समोरच उभ्या असलेल्या कोहलीकडे तो चेंडू गेला आणि बवुमा त्यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कोहलीने बवुमाच्या दिशेने जोरात चेंडू फेकला, पण यष्टीरक्षक ऋषभ पंतला तो चेंडू रोखता आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बवुमा हा धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला धाव घेता आली नाही, पण त्यावेळी कोहली बवुमाच्या दिशेने थोडा पुढे सरसावला आणि त्याला उद्देशून काहीतरी बोलला.
मात्र, बवुमाने कोहलीकडे दुर्लक्ष केले व आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. बवुमा जरी शांत राहिला असला तरीही असंख्य क्रिकेट चाहत्यांनी कोहलीला लक्ष्य केले असून नेतृत्व गेले तरीही अहंकार कायम राहिला, अशा शब्दात कोहलीची खिल्ली उडवली आहे.





