Delhi Farmer Protest | गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून खासदार सुप्रिया सुळे संतप्त, म्हणाल्या….

नवी दिल्ली – अजूनही वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवून शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच देशातील परिस्थिती कुणाच्याच हिताची नाही. सरकारने यातून मार्ग काढण्याची भूमिका घेतली पाहीजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.
सुप्रिया सुळे आज गाझीपूर बॉर्डर येथे कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, “गाझीपूर बॉर्डर, दिल्ली येथे गेली 70 दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो.परंतु आम्ही खासदार असून देखील पोलिसांनी आम्हाला इथे अडवून ठेवलं .गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का ? असा प्रश्न पडला.
पुढे त्या म्हटल्या, आपण अन्नदाता सुखी भव: असं म्हणतो. परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. गाझीपूर बॉर्डरवर अतिशय वाईट परिस्थितीत शेतकरी राहात आहेत. देशाच्या सीमेवर देखील एवढी वाईट परिस्थिती नसेल. इथे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. इंटरनेट बंद केलेलं आहे. ही संतापजनक परिस्थिती आहे. हे शेतकरी भारताचीच मुलं आहेत ना? अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली.
आपल्या संस्कृतीत ‘अन्नदाता सुखी भव’ असा उल्लेख आहे.पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे,हे निषेधार्ह आहे. संपूर्ण रस्ता एखाद्या किल्ल्यासारखा चहूबाजूंनी बंदिस्त केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अन्न,पाणी व इतर आवश्यक सुविधा मिळू द्यायच्या नाहीत असा जणू चंग केंद्र सरकारने बांधलाय. असं म्हणत खासदार सुळे यांनी केंद्र सरकारचा जाहिर निषेध केला.





