Ashadhi Wari 2025 : कोहिनूर ग्रुपतर्फे वारकऱ्यांचे स्वागत, ३००० रेनकोट वाटपाचा उपक्रम

आळंदी : पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या वारीतील वारकऱ्यांचे कोहिनूर ग्रुपतर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले.
कोहिनूर ग्रुपने यंदा सुमारे ३००० रेनकोट वाटपाचा उपक्रम राबविला असून, या कार्यात खडकी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच अगरवाल समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वाटपाच्या ठिकाणी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानदेव-तुकाराम” आणि “विठ्ठल-रुक्मिणी”च्या जयघोषात वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या भाविकांसाठी हा उपक्रम खूप उपयोगी ठरतो आहे.
दरवर्षी वारकऱ्यांना प्रथमोपचार किट वाटप करण्याची परंपरा कोहिनूर ग्रुपने यापूर्वीपासूनच सुरू केली असून, यंदा पावसाचा अंदाज लक्षात घेता रेनकोट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे कार्य भविष्यातही सुरू राहील, असे कोहिनूर ग्रुपकडून सांगण्यात आले.





