भाजप खासदार तेजस्वी सूर्या अडकणार विवाहबंधनात? कोण आहे होणारी पत्नी? वाचा

Tejasvi Surya: भाजप खासदार तेजस्वी सूर्या आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. तेजस्वी हे भाजपच्या सर्वात तरूण खासदारांपैकी एक आहेत. ते दक्षिण बेंगळुरूचे खासदार आणि बीजेपी युवा मोर्चाचे अध्यक्ष देखील आहेत. तेजस्वी सूर्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. ते लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या पत्नीचे नाव देखील समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, तेजस्वी सूर्या हे चेन्नई येथील प्रसिद्ध गायिका आणि भरतनाट्यम कलाकार शिवश्री स्कंदप्रसादशी लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. तेजस्वी अथवा शिवश्री यांच्याकडून अद्याप अधिकृतरित्या लग्नाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोण आहे शिवश्री स्कंदप्रसाद?
रिपोर्टनुसार, तेजस्वी सूर्या आणि शिवश्री स्कंदप्रसाद हे 4 मार्च 2025 ला बंगळुरू येथे लग्न करणार आहेत. तेजस्वी सूर्या यांच्या पत्नीबद्ल सांगायचे तर शिवश्री या गायिका आणि कुशल भरतनाट्यम कलाकार आहेत. कलेसोबतच त्या उच्च-शिक्षित देखील आहेत. शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनिअरिंगमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. याशिवाय, त्यांनी चेन्नई विद्यापीठातून भरतनाट्यममध्ये एमए आणि मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये एमए पूर्ण केले आहे.
शिवश्री या सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर 2 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्यांनी ‘पोन्नियिन सेल्वन: भाग 2’ कन्नड भाषेतील व्हर्जन मधील ‘वीरा राजा वीरा’ गाणे गायले आहे.




