Canada plane crash : कॅनडात प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं ; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Canada plane crash : कॅनडामध्ये विमान प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Canada plane crash : कॅनडामध्ये विमान प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तामिळनाडूतील मनोज शिवकुमार आणि पुदुचेरीतील श्रीसरण तिरुज्ञानसंबंथम यांचा समावेश आहे. व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने दोघांच्या मृत्यूला दुजोरा देत शोक व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही विद्यार्थी व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवण्यासाठी आवश्यक उड्डाणाचे तास पूर्ण करण्याच्या प्रशिक्षणात होते. सस्कॅचेवानमधील किस्बे परिसरात Harv’s Air या फ्लाइट स्कूलचे सेसना १७२ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विमानात दोन जण होते आणि अपघातानंतर शोध व बचाव पथकांनी दोघांचेही मृतदेह घटनास्थळी शोधून काढले.
भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून, त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आवश्यक ती मदत केली जात आहे. स्थानिक प्रशासनासोबतही दूतावास समन्वय साधत आहे.
विमान रात्रीच्या क्रॉस-कंट्री प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होते. ते रेजिनाहून कार्लाइलमार्गे मॅनिटोबातील स्टाइनबॅकच्या दिशेने जात होते. विमान अपेक्षित वेळेत गंतव्यस्थानी न पोहोचल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विमानाचे अवशेष आढळून आले.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून दुर्घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व दूतावासीय मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.






