90 तास काम: भारतात कर्मचारी आठवड्याला किती तास काम करतात? त्यांना किती पगार मिळतो? वाचा

90-hr Work Week Debate: सध्या भारतात कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे नक्की किती तास काम करायला हवे? याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. यामागचे कारण ठरले लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांचे वक्तव्य. एसएन सुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे, असे मत व्यक्त केले. मात्र, अशाप्रकारचे मत व्यक्त करणारे ते एकमेव नाहीत. याआधी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनीही अशाचप्रकारचेच वक्तव्य केले होते.
देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या उच्च पदावर असलेल्या या व्यक्तींनी अशाप्रकारे मत व्यक्त केल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहीजण हे मत बरोबर असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण हे ‘कर्मचाऱ्यांचे शोषण’ असल्याचे म्हणत आहेत.
अनेक उद्योजकांनी देखील यावर त्यांचे परखड मत व्यक्त केले. मात्र, खरचं कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे 90 तास काम करायला हवे का? कठोर परिश्रमाच्या तुलनेत भारतीय कर्मचाऱ्यांना खरचं तेवढा पगार आहे का? याचा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
नारायण मूर्ती व एसएन सुब्रहमण्यन नक्की काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी जगातील इतर अर्थव्यवस्थेशी भारताला स्पर्धा करायची असल्यास तरुणांनी आठवड्याला 70 तास काम करणं गरजेचे आहे. असे वक्तव्य केले होते. त्यांच्यापाठोपाठ एसएन सुब्रह्मण्यन यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे, कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे, असे मत व्यक्त केले.
त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना एलअँडटी कंपनीने ‘भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी व विकसित राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे’, या उद्देशाने हे मत व्यक्त केल्याचे म्हटले होते.
इतर उद्योजक काय म्हणाले?
एसएन सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यानंतर विविध क्षेत्रातील उच्च पदावरील यावर मत व्यक्त केले. काहींनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित केला, तर काहींनी कामाच्या तासापेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे यावर मत व्यक्त करताना म्हणाले की, ‘कामाच्या कालावधीपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला हवे. 90 तास काम करण्याचा मुद्दा नाही. तुम्ही कशाप्रकारचे काम करत आहात, ते महत्त्वाचे आहे. 10 तास काम करून जग बदलता येऊ शकते.’
आनंद महिंद्रांप्रमाणेच सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी देखील मत व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, माझी पत्नी नताशा पूनावाला हिला देखील मी विलक्षण वाटतो. ती रविवारी माझ्याकडे पाहते. कामाच्या प्रमाणाऐवजी गुणवत्तेला नेहमी प्राधान्य द्या.
एडलवाइस म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी देखील यावर भाष्य केले. राधिका या भारतातील कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या पहिल्या सीईओ आहेत. त्या म्हणाल्या की, मी माझ्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या प्रोजेक्टवर सलग चार महिने आठवड्यातून 100 तास काम केले. पण, मी 90 टक्के वेळ दु:खी असायचे.
उद्योजक आणि शार्क टँक इंडियाचे जज असलेल्या अनुपम मित्तल यावर बोलताना म्हणाले की, जर पती-पत्नी एकमेकांना पाहत नसतील, तर आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कसे राहू?, अशी मजेशीर प्रतिक्रिया त्यांनी दिली.
इतर देशांमध्ये कर्मचारी किती तास काम करतात?
एकीकडे कर्मचाऱ्यांनी किती तास काम करायला हवे यावर मत व्यक्त केले जात असताना, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोणीही भाष्य करताना दिसत नाही. इतर विकसित देशांचा विचार करता भारतात कामाच्या तुलनेत खूपच कमी वेतन मिळत असल्याचे दिसून येते.
भारतात आठवड्याला 49 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 51.4 टक्के एवढी आहे. मात्र, त्यांचे सरासरी मासिक वेतन 220 डॉलर आहेत. याच तुलनेत फ्रान्समध्ये केवळ 8.8 टक्के कर्मचारी आठवड्याला 49 तासांपेक्षा अधिक वेळ काम करतात. मात्र, त्यांचे सरासरी मासिक वेतन हे 2,016 डॉलर एवढे आहे. याचाच अर्थ, कामाचे तास कमी असले तरीही भारतीयांच्या तुलनेत या देशातील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा 10 पट अधिक आहे. स्विर्झलंडमध्ये हाच आकडा 3,226 डॉलर एवढा आहे.
इराण सारख्या देशातही एकूण कार्यकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 31.9 टक्के कर्मचारी आठवड्याला 49 तासांपेक्षा अधिक वेळ काम करतात. मात्र, त्यांना महिन्याला सरासरी 681 डॉलर एवढे वेतन दिले जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या तुलनेत योग्य पगार मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक कर्मचारी हे अतिरिक्त तास काम करणे टाळतात, असेही दिसून आले आहे.
भारतात 5 दिवसांचा आठवडा लागू आहे का?
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, भारत अशा देशांपैकी एक आहे, जेथे लोक सर्वाधिक तास काम करतात. दक्षिण आशियाई देशांमध्येही भारत सर्वात पुढे आहे. भारतातील लोक सरासरी आठवड्याला 46.7 तास काम करतात. तर एकूण कार्यकारी लोकसंख्येच्या तुलनेत 51 टक्के कर्मचारी आठवड्याला 49 तासांपेक्षा अधिक काम करतात.
भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये, तसेच काही राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू आहे. मात्र, याची सर्वत्र ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामागचे प्रमुख कारण म्हणजे भारतात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
2019-20 च्या आकडेवारीनुसार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या भारतात तब्बल 43.99 कोटी एवढी होती. अशा कर्मचाऱ्यांना नियमित वेतन, पेन्शन, विमा सुविधाही उपलब्ध नसतात. याशिवाय, त्यांच्यासाठी ठराविक कामाचे तासही नसतात. अशा कर्मचाऱ्यांना आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागते.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम
एकीकडे 90 तासांच्या कामाच्या चर्चा होत असताना, यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दाही केंद्रस्थानी आला आहे. ‘वर्क लाइफ बॅलेन्स’, ‘मायक्रो रिटायरमेंट’ सारख्या विषयावर आता मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना पाहायला मिळते. तासंतास काम केल्याने आरोग्यावर शारीरिक व मानसिक परिणाम होऊ शकतो, असेही मत व्यक्त जात आहे. तर दुसरीकडे, तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता यानुसार कामाचे तास ठरवायला हवेत, असेही मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.


