देशातील गरिबी कशी दूर होणार? नारायण मूर्तींनी सांगितला उपाय, सरकारी योजनांवर म्हणाले…

N.R. Narayana Murthy | सध्या केंद्र सरकार व प्रत्येक राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. मात्र, या मोफत योजनांना अनेकांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून देखील याबाबत टिप्पणी करण्यात आली होती. आता इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
मोफत वस्तू देऊन गरिबी दूर होणार नाही, तर नाविन्यपूर्ण उद्योजकांनी रोजगार निर्मिती करूनच ती दूर होईल, असे मत नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले आहे. टायकॉन मुंबई-2025 कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तसेच, यावेळी त्यांनी उद्योजकांना अधिक कंपन्या आणि व्यवसाय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
उद्योजकांना संबोधित करताना मूर्ती म्हणाले की, तुम्ही प्रत्येकजण लाखो नोकऱ्या निर्माण कराल आणि अशा प्रकारे तुम्ही गरिबीची समस्या सोडवाल याबद्दल मला शंका नाही. मोफत वस्तू देऊन तुम्ही गरिबीची समस्या सोडवू शकत नाही, यात कोणताही देश यशस्वी झालेला नाही. आपण नाविन्यपूर्ण उद्योग निर्माण करू शकलो तरच गरिबी नाहीशी होईल.
ते पुढे म्हणाले की, या फायद्यांद्वारे परिस्थितीत झालेल्या सुधारणांचेही मूल्यांकन केले पाहिजे. दरमहा 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उदाहरण देत ते म्हणाले की, राज्य सहा महिन्यांच्या शेवटी अशा घरांमध्ये सर्वेक्षण करू शकते, जेणेकरून मुलं जास्त अभ्यास करत आहेत की नाही हे शोधता येईल.
यावेळी बोलताना त्यांनी एआयवर देखील भाष्य केले. आजकालचे जे भविष्य म्हणून प्रचारित केले जात आहेत, त्यातील बहुतांश एआय हे ‘मूर्ख, जुने कार्यक्रम’ असल्याचेही ते म्हणाले.




