Germany Knife Attack | जर्मनीमधील हॅम्बर्ग येथील मेन रेल्वे स्टेशनवर चाकू हल्ला झाला. ज्यात १२ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत हॅम्बर्ग पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, ‘मेन ट्रेन स्टेशनवर एका व्यक्तीने अनेकांना चाकूने जखमी केले आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटेनेतील संशयित ही ३९ वर्षांची महिला होती. या प्रकरणाचा तपास वेगाने केला जात आहे असेही अधिकाऱ्यांनी सांगितले, पण या हल्ल्यामागील हेतू काय होता याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलिस संशयित महिलेची चौकशी करत आहेत. नेमकं काय घडलं? प्रादेशिक प्रसारक एनडीआरच्या हवाल्याने असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हॅम्बुर्ग स्टेशनवर वाट पाहणाऱ्या ट्रेनसमोर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा हल्ला झाला. प्रवासी ट्रेनमधून चढत असताना किंवा उतरत असतानाच हा हल्ला झाला आहे. हल्ल्यानंतर, शुक्रवारी संध्याकाळी स्टेशनवरील चार ट्रॅक बंद करण्यात आले होते. तसेच त्यांचे मार्गही बदलण्यात आले. ज्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर झाला. हेही वाचा: “शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला साजरा करण्याची पध्दत बंद करा”; संभाजी भिडेंच्या विधानावरून पुन्हा वाद?