KL Rahul Century : नॉर्थहॅम्प्टनवर केएल राहुलचा शतकी जलवा: कसोटी मालिकेपूर्वी दाखवला ट्रेलर!

KL Rahul Century ahead IND vs ENG Test Series : नॉर्थहॅम्प्टनच्या काउंटी ग्राउंडवर इंडिया ए संघाकडून खेळताना केएल राहुलने इंग्लंड लायन्सविरुद्ध शानदार शतक ठोकले. सलामीवीर म्हणून खेळपट्टीवर उतरलेल्या राहुलने १३ चौकार आणि एका षटकारासह १५१ चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केले. हे शतक विशेष ठरले कारण राहुलने आयपीएल खेळल्यानंतर इंग्लंडमधील पूर्णपणे वेगळ्या परिस्थितींमध्ये ही कामगिरी केली. हिरव्या खेळपट्टीवर आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंचा त्याने चोखपणे सामना केला.
केएल राहुलच्या शतकाने इंडिया-ए ला सावरले –
या शतकाने त्याने जणू इंग्लंडच्या संघासाठी येणाऱ्या कसोटी मालिकेतील आव्हानांचा ट्रेलरच दाखवला आहे. केएल राहुलचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १९वे शतक आहे. त्याचे हे शतक विशेष ठरले कारण इंडिया-ए अडचणीत असताना त्याच्या बॅटमधून या धावा आल्या. इंडिया-ए ची सुरुवात खराब झाली होती. यशस्वी जैयस्वाल अवघ्या १७ धावांवर बाद झाला, तर अभिमन्यु ईश्वरननेही फक्त ११ धावा केल्या.
First 💯 for India A and 19th in 1st class career 🙌🏻#KLRAHUL pic.twitter.com/iKCutUsAsq
— chaituuuu (@KeLuRahul) June 6, 2025
दोन विकेट्स पडल्यानंतर केएल राहुलने संघाची धुरा सांभाळली. त्याने करुण नायरसोबत मिळून संघाची धावसंख्या १२६ धावांपर्यंत नेली. करुण नायर ४० धावांवर बाद झाला. यानंतर राहुलने यष्टीरक्षक ध्रुव जुरेलसोबत शानदार शतकीय भागीदारी करत इंग्लंड लायन्सला मागे ढकलले. राहुलने शतक पूर्ण केले, तर जुरेलने अर्धशतक झळकावले.
केएल राहुलचं शतक का आहे महत्त्वाचं?
केएल राहुलने नॉर्थहॅम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामन्यात शतक झळकावलं असलं, तरी इंग्लंड दौऱ्याच्या दृष्टीने ही खेळी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केलं आहे. आता भारतीय संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या हाती आहे. भारतीय संघात आता पूर्वीसारखे अनुभवी फलंदाज नाहीत. अशा परिस्थितीत केएल राहुल हा एक वरिष्ठ खेळाडू आहे आणि त्याचा फॉर्म इंग्लंडमधील भारतीय संघाचं भवितव्य आणि दिशा ठरवू शकते.





