KL Rahul death over record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर केएल राहुलच्या बॅटचा तडाखा पाहायला मिळाला. संकटात सापडलेल्या भारतीय संघाला सावरत राहुलने नाबाद ११२ धावांची खेळी केली. राहुलच्या या शतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत ७ बाद २८४ धावांपर्यंत मजल मारली. यासह त्याने एक खास पराक्रमही आपल्या नावावर केला. केएल राहुल: नवा ‘डेथ ओव्हर्स’ किंग – केएल राहुलने या खेळीदरम्यान एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. २०२५ पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४१ ते ५० षटकांच्या दरम्यान सर्वाधिक धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने १४०.०९ च्या स्ट्राईक रेटने २८३ धावा कुटल्या असून, या बाबतीत त्याने न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सलाही मागे टाकले आहे. २०२५ पासून ४१-५० षटकांत सर्वाधिक धावा (पूर्ण सदस्य देश): केएल राहुल: २८३ धावा (SR: १४०.०९) ग्लेन फिलिप्स: २४४ धावा (SR: १५७.४) जनिथ लियानागे: २०१ धावा (SR: १४७.८) हेही वाचा – KL Rahul Century : केएल राहुलचे राजकोटमध्ये ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच खेळाडू भारताच्या डावाचा चढ-उतार – नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्मा (२४) आणि कर्णधार शुबमन गिल (५६) यांनी ७० धावांची आश्वासक सलामी दिली. मात्र, मधल्या फळीत विराट कोहली (२३) आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाल्याने भारत ११८ धावांवर ४ बाद अशा स्थितीत होता. यानंतर केएल राहुलने मैदानाचा ताबा घेतला. त्याने रवींद्र जडेजासोबत (२७) पाचव्या विकेटसाठी ७३ धावांची आणि नितीश रेड्डीसोबत (२०) सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. राहुलने ९२ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने कारकिर्दीतील ८ वे वनडे शतक पूर्ण केले. हेही वाचा – Christian Clarke : रोहित-विराटला बाद करून खळबळ उडवणारा कोण आहे हा क्रिस्टियन क्लार्क? न्यूझीलंडला मिळाला नवा ‘हुकमी एक्का’ क्रिस्टियन क्लार्कची गोलंदाजीत दमदार कामगिरी – न्यूझीलंडकडून युवा गोलंदाज क्रिस्टियन क्लार्क पुन्हा एकदा प्रभावी ठरला, त्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. त्याला काइल जेमिसन, जॅक फॉल्क्स, जेडेन लेनोक्स आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेत साथ दिली.