पुणे जिल्हा | थेऊरच्या मंडल अधिकारीपदी किशोर जाधव, लोणीत लक्ष्मण बांडे

थेऊर, (वार्ताहर)- बहुचर्चित असलेल्या थेऊरच्या मंडल अधिकारीपदी किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर जाधव यांनी पूर्वी हवेली तहसील कार्यालयात कुळकायदा शाखा व आरटीएस विभागात प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत आपल्या कार्यतत्परतेची छाप उमटवलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच तलाठी व मंडल अधिकारी यांच्या जिल्हाभरातील बदल्या केल्या आहेत. यापूर्वी तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रांताधिकार्यांना होते; मात्र तलाठ्यांच्या बदल्यांमध्ये अनेक तक्रारी होत होत्या. त्यातच काही जणांनी मॅट न्यायाधिकरणात धाव घेतली होती.
त्यामुळे शासनाने तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रांताधिकारी यांचेकडून काढून घेत जिल्हाधिकार्यांना दिलेले आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या नवनियुक्तींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नव्यानेच तयार झालेल्या लोणी काळभोरच्या मंडल अधिकारीपदी लक्ष्मण बांडे यांची नियुक्ती झाली आहे. उरुळीकांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी लोणी काळभोर येथील अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता.
लक्ष्मण बांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेत यापूर्वी कार्यभार सांभाळला आहे. तसेच शिंदवणे येथील तलाठी प्रदीप जवळकर यांची मुळशी तालुक्यातील कासारसाई या सजावर बदली झाली आहे.
नायगाव येथील तलाठी निवृत्ती गवारी यांची खेड तालुक्यातील चाकण तलाठी कार्यालयात नियुक्ती झाली आहे. लोणीकंद येथील तलाठी गणेश सासणे यांची मुळशी तालुक्यातील भुकूम तलाठी कार्यालयात बदली झाली आहे.




