पुणे जिल्हा | बाळहिरड्याचा हमीभाव जाहीर करण्याची किसान सभेची मागणी

मंचर, (प्रतिनिधी) – बाळहिरड्याचा योग्य असा हमीभाव त्वरित जाहीर करावा, यासाठी किसानसभेच्या शिष्टमंडळाने नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची भेट घेऊन कार्यवाही करण्याची मागणी केली.
मागील पाच ते सात वर्षांपासून शासकीय पातळीवरील बाळहिरडा खरेदी थांबवलेली होती. योग्य हमीभाव देऊन ही खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी मागील तीन वर्ष किसान सभा सातत्याने लोकशाही मार्गाने लढत आहे.
या लढ्याचा परिणाम म्हणजे, आदिवासी विकास महामंडळ यांनी बाळहिरडा खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता व खरेदीचा हंगाम सुरू करण्याअगोदर फेब्रुवारी महिना अखेर, बाळहिरड्यास योग्य असा हमीभाव जाहीर करू, असे लेखी आश्वासन किसान सभेला आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांचे कार्यालयाच्या वतीने देण्यात आले होते.
यावेळी,किसान सभेला दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता लवकर व्हावी व आदिवासी लोकांचे प्रमुख उत्पनाचे साधन हे बाळहिरडा असल्याने त्याला योग्य असा हमीभाव द्यावा, अशी मागणी,किसानसभेच्या वतीने यावेळी करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर,व्यवस्थापकीय संचालक,आदिवासी विकास महामंडळ यांनी या आठवड्यातच बाळहिरडयाचा हमीभाव आम्ही जाहीर करू असे नमूद केले.
हमीभावापेक्षा जास्त दर देवू
याबरोबरच, हिरड्याला जो हमीभाव जाहीर केला जाईल. त्याच्यापेक्षा कमी दरात हिरड्याची खरेदी महामंडळ करणार नाही. उलट बाजारात हिरड्याचे दर वाढले तर त्याचा आढावा घेऊन हमीभावापेक्षा जास्त दर दिला जाईल, असे ही त्यांनी यावेळी आश्वासित केले. किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, प्रा. ज्ञानेश्वर सावळे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, राजू शेळके इत्यादी उपस्थित होते.





