किरीट सोमय्यांच्या सत्कारासाठी गर्दी; भाजप शहराध्यक्षांसह 300 जणांवर गुन्हा दाखल

पुणे – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी बेकायदेशीर गर्दी जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह तीनशे जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी जमावबंदीच्या आदेशाचा भंग केला असून मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातातील ढाल, हेल्मेटचे बेल्ट तुटून नूकसान झाले आहे.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर, राजेश येनपूरे, दीपक पोटे, धनंजय जाधव, दत्ता खाडे, गणेश घोष, प्रतीक देसरडा यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने फिर्याद दिली आहे. भाजपकडून पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. मात्र, महापालिकेत नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम न घेता मर्यादीत संख्येत बंदीस्त हॉलमध्ये कार्यक्रम घेण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले होते. परंतु भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन न करता मोठी गर्दी जमविली. तसेच, जोरदार घोषणाबाजी केली.
मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे बॅरीकेड सरकवून अनेकजण त्यामध्ये अडकले होते. तर, बंदोबस्तावरील काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरील कॅप, हेल्मेटचा बेल्ट आदी वस्तूंचे नूकसान झाले आहे. याशिवाय शहरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी घातलेली असताना कार्यकर्त्यांनी आदेशाचा भंग करून बेकायदेशीर गर्दी जमविली. परिणामी सुमारे तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





