Kiren Rijiju : भारतासाठी बोलणे काँग्रेसमध्ये निषिद्ध आहे का? किरेन रिजिजू यांचा सवाल

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय खासदारांची सात पथके विविध देशांत जाऊन देशाची बाजू मांडत आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय खासदार आहेत. अशा स्थितीत जर राज्यसभा सदस्य शशी थरूर भारताचीच बाजू मांडत असतील, तर काॅंग्रेसजनांना त्याचा त्रास का व्हावा? भारतासाठी बोलणे काँग्रेसमध्ये निषिद्ध आहे का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विचारला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांना सध्या त्यांच्याच पक्षाकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार उदित राज यांनी थरूर यांना भाजपचे सुपर प्रवक्ता म्हटले आहे. त्यावर किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाला काय हवे आहे आणि त्यांना देशाची किती काळजी आहे? भारतीय खासदारांनी परदेशात जाऊन भारत आणि त्याच्या पंतप्रधानांविरुद्ध बोलावे का? राजकीय हताशतेला मर्यादा असतात. अजूनही काॅंग्रेसने आपल्या भूमिकेत बदल करावा.
काँग्रेस खासदार शशी थरूर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. काँग्रेसने त्यांचे नाव प्रस्तावित केले नव्हते. शशी थरूर यांनी पनामातील दहशतवादाविरुद्ध भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले होते की, आमचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही. आमचा देश कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देईल. पनामा येथील भाषणात शशी थरूर यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट स्ट्राईकचा उल्लेख केला होता.
मी पक्षाबद्दल बोललो: उदित
काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की तुम्ही माझ्या आणि माझ्या पक्षाच्या भूमिकेत फरक का करत आहात? जयराम रमेश आणि पवन खेरा यांनीही मी काल जे बोललो तेच सांगितले. डॉ. थरूर यांना पक्षातून निलंबित करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की ते कार्यकारिणी, राष्ट्रीय अध्यक्ष आणि राहुल गांधींवर अवलंबून आहे. जर ते चुकीचे विधान करतात आणि काँग्रेसचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात, तर मी काँग्रेसच्या बाजूने उभा आहे.





