किंग खान नेगेटीव्ह व्यक्तीरेखेत; पुष्पाच्या दिग्दर्शकासोबत नवा प्रोजेक्ट? सोशल मीडियावर काय चर्चा सुरुऐ…

Shah Rukh Khan, Sukumar | बॅालीवूडचा किंग खान डिसेंबर २०२३ मध्ये डंकी या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सध्या त्याच्या किंग या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटातील कास्ट फायनल झाली असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. शाहरुखकडे अनेक चित्रपट आहेत, त्या चित्रपटांविषयीच्या बातम्या येत आहेत. अशातच आता एका चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शन एकत्र येणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.
या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, या चित्रपटात शाहरुख नकारात्मक भूमिका साकारणार आहे. शाहरुखने याअगोदर काही मोजक्याच चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारलेली होती. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या अंजाम चित्रपट, यश चोप्राचा ‘डर’, ‘बाजीगर’मध्येही त्याने साकारलेल्या नेगेटीव्ह पात्र, या सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी अनोखा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता सुकुमार यांच्या चित्रपटातही शाहरुख पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारणार असल्याने याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे.
या नव्या प्रोजेक्टबद्दल अजूनही कोणतीही अधिकृत गोष्ट समोर आलेली नाही. शाहरुख आणि सुकुमार यांच्या टीमकडूनही नव्या प्रोजेक्टबद्दल कोणताही दुजारा देण्यात आलेला नाही. शाहरुखबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘किंग’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. निर्मात्यांना हा चित्रपट मार्च किंवा एप्रिलमध्ये फ्लोअरवर घ्यायचा होता. पण नुकतीच बातमी आली होती की चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद स्क्रिप्टच्या काही भागात बदल करत आहे. त्यानंतर किंगच्या शुटिंगला सुरुवात केली जाणार आहे.





