पुणे | अनैतिक संबंधांत अडथळा ठरणार्या पतीचा खून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अनैतिक संबंधांत अडथळा ठरणार्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कर्वेनगरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे.
तिने जबरी चोरीचा बनाव रचत खून झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा बनाव जास्तवेळ टिकू शकला नाही.
अमोल पंढरीनाथ निवंगुणे ( ४२, रा. कर्वेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रसन्न साहेबराव कोकरे (२७, रा. आनंद विहार, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली. अमोल हे वाहनचालक होते.
त्यांची पत्नी आणि आरोपी प्रसन्न हे वारजेतील एका बिर्याणी हाऊसमध्ये कामाला होते. पण, त्यांच्या प्रकरणाची माहिती बिर्याणी हाउस मालकाला समजल्याने दोघांनाही कामावरुन काढले होते. प्रसन्नसोबतच्या संबंधामुळे सदरील महिला आणि पती अमोल यांच्यात नेहमी वाद व्हायचे.
शुक्रवारी रात्री महिलेने पती अमोलच्या जेवणात विषारी औषध टाकले. यामुळे अमोल बेशुद्ध पडले. यानंतर प्रसन्न तेथे आला आणि त्याने कोयत्याने अमोल यांच्या गळ्यावर वार करत खून केला.
त्यावर अमोलच्या पत्नीने पोलिसांना फोन करुन घरात दोन चोरांनी पतीवर वार केल्याची माहिती दिली. यानंतर अमोलला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केली असता, घरातून फक्त एकच जण बाहेर पडतांना दिसत होता. तसेच खून हा अत्यंत निर्घृणपणे केल्याचे लक्षात आले.
त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली आणि पोलिसांनी महिलेला खाक्या दाखवताच तिने केलेल्या कृत्याची कबुली दिली. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये आणि पथकाने ही कारवाई केली.
डोळ्यांदेखत वडिलांचा खून
डोळ्यांदेखत वडिलांचा निर्घृण खून झाल्याने अमोल यांच्या तीन मुलींना मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांच्या माध्यमातून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.





