भाडेकरुच्या बायकोसोबत अनैतिक संबंध; घरमालकाचा धक्कादायक शेवट

जळगाव – भाड्याने राहत असलेल्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे घरमालकाचा धारदार हत्यार आणि दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली आहे. प्रमोद शेट्टी (वय -33, रा. जळगाव) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या खूनप्रकरणात दोन जणांना जळगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
प्रमोद शेट्टी याचे त्याच्या घरात भाड्याने राहत असलेल्या विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून प्रमोद बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला असता निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली आणि दोन आरोपींना जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. सत्यराज गायकवाड, (वय 26 रा. जळगाव), सुनिल तडवी, (वय 26 , जळगाव) अशी खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





