पुणे – भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पोटात चाकू खुपसून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन. शिंदे यांनी सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. राजू पुनाराम मिर्झा (वय ३०, रा. खांदवेनगर, वाघोली, मूळ. छत्तीसगढ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पत्नी अनु (वय २८) हिचा खून केल्याप्रकरणी दीर राजेश (वय २२) याने लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ अॉगस्ट २०२१ रोजी पहाटे ५ वाजता वाघोली येथे घडली. राजू आणि राजेश भाऊ आहेत. दोघे छत्तीसगढ येथून रोजगारासाठी पुणे येथे आले आहेत. राजू याचा अनु हिच्याशी प्रेम विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. राजू मद्य प्राशन करून चारित्र्याच्या संशयावरून अनुला मारहाण करायचा. घटनेपूर्वी तीन महिने राजूने अनुला मारहाण करून घराबाहेर काढले. याबाबत तिने फोन करून राजेशला सांगितले. त्यावेळी राजेशच्या सांगण्यावरून मुलाला घेऊन ती त्याच्याकडे राहायला गेली. त्यामुळेच भाऊ राजेशची अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून राजूने अनुचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विद्या जाधव यांनी काम पाहिले. लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून प्रदीप कडूकर यांनी काम पाहिले. तर, हवालदार शुभांगी कुरंदळे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.