Washim Farmer | पीककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याने एका शेतकऱ्याने स्वतः सह पत्नी आणि मुलांचे अवयव विकायला काढले आहेत. वाशिमच्या अडोळी येथील राहणाऱ्या या शेतकऱ्याच नाव सतीश इढोळे असे आहे. त्यांनी अवयवांचे दर लिहिले फलक अंगावर लावून वाशिमच्या मुख्य बाजारात उभे राहत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात सरसकट पीककर्ज माफीची घोषणा केली होती. मात्र सत्ता आल्यापासून अद्यापही यावर कोणता निर्णय झालेला नाही. यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफी करणं शक्य नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचं आवाहन केलं. सगळी सोंग करता आली तरी पैशांचं सोंग करता येत नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे. परंतु विकण्यासाठी कोणताही शेतमाल शिल्लक नसल्याने कर्जाची रक्कम भरण्यासाठी वाशिमच्या शेतकऱ्याने थेट अवयवच विक्रीसाठी काढले आहेत. ‘किडन्या घ्या आणि कर्जातून मुक्त करा’ सतीश इढोळेंनी सांगितले की, सरकारने सांगितले कर्जमाफ करू त्या भरवश्यावर आम्ही बसलो. सरकारने आश्वासन दिले आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. पण शेतकऱ्याचा तळतळाट या सरकारला असा लागेल की यांचं सरकार पलटी होईल. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याने विकावं काय हेच कळतं नाही. बियाणे, खत महाग आहे. पुढची पेरणी आम्ही करू शकत नाही. सरकारमुळे ही आमची दशा झाली आहे. त्यामुळे किडन्या घ्या आणि आमच्या डोक्यावरच्या कर्जातून मुक्त करा,” असे म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली. सतीष इढोळे यांनी किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार आणि डोळे २५ हजार असे त्या बॅनरवर नमूद केले होते. एकीकडे अवकाळी पावसामुळे पीकांचे नुकसान होत आहे. त्यात शेतकऱ्यांचा कर्जाचा भार अधिकच वाढत आहे, असे असतानाही सरकारकडून याबाबत कोणाताही ठोस निर्णय घेतला जात नाही. यामुळे बळीराजा पुढे संकट उभे राहिले उभे राहिले आहे. हेही वाचा: Maharashtra IAS transfers : बदल्यांचा धडाका सुरूच; सात IAS अधिकारी बदलले, राजेंद्र भारुड, निधी पांडे यांचा समावेश