Kidnapped Case: रात्रीच्या अंधारात कार आडवी लावली अन्…; भोरमधील वेळू गावातून युवकाचं थरारक अपहरण
Kidnapped Case: राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; मुख्य आरोपीसह पाच जणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना.

Kidnapped Case – भोर तालुक्यातील वेळु गाव परिसरात दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे एका मुख्य आरोपीसह इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
फिर्यादी ओंकार नंदकुमार वाडकर (वय २८, रा. वाडकर वस्ती, वेळु, ता. भोर) हे दि. २५ जून रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरून सर्व्हिस रोडने वेळुकडे जात होते. त्यावेळी आरोपी कुणाल मोहीते (रा. शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे) व त्याच्या साथीदारांनी त्यांची हुंडाई कंपनीची वेन्यू कार रस्त्यात आडवी लावून फिर्यादीचा रस्ता अडविला.
यानंतर आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मौजे आर्वी गावाच्या हद्दीतील एका पत्र्याच्या शेडजवळ नेले. तेथे फिर्यादीला शेडमध्ये नेऊन हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून, “तुझे चुलत भाऊ अनिकेत व मयूर यांना येथे बोलावून घे, अन्यथा तुला ठार मारू,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेदरम्यान दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून तेथे आले व पोलिसांची गाडी परिसरात फिरत असल्याची माहिती आरोपींना दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पुन्हा त्याच कारमधून आर्वी फाटा येथे आणून सोडल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून राजगड पोलीस स्टेशन येथे आरोपी कुणाल मोहीते व त्याच्या इतर चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले करीत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार राणे यांनी पूर्ण केली. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.





